कराड : पनर्रचित कराड-उत्तर विधानसभा मतदार संघाची रचना झाल्यानंतर सातारा तालुक्यामधील गावांना विकास कामांसाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी भक्कमपणे साथ केली असल्याचे प्रतिपादन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निसराळे, ता.जि.सातारा येथे केले.
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने निसराळे ता.सातारा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमीपूजन समारंभ आमदार बाळासाहेब पाटील याच्या शुभहस्ते व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यंाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले की, स्वर्गीय भाऊसाहेब महाराज व स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या विचारांचा व विकासाचा वारसा आम्ही दोघे जपत असून यापुढील काळातही आमदार बाळासाहेब पाटील विकास कामांत अग्रेसर राहतील. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना भक्कमपणे साथ द्या. तसेच सध्याचे सरकार सहकारी संस्था अडचणीत आणणेसाठी प्रयत्नशील आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 कोटी रूपये जुन्या नोटा शिल्लक आहेत. त्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे आर्थिक नुकसान होत आहे. देशामध्ये रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांनी घालून दिलेले सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून जिल्हा बँकेचे कामकाज आदर्शवत आहे. मात्र पूर्वग्रहदुषित धोरण ठेवून बँकेसह सर्वच सहकारी संस्थांना अडचणी निर्माण करून सर्वसामान्यांचा त्रास देण्याचे काम सरकारकडून होत आहे. पाणीपुरवठा योजनांना या सरकारने कोणत्याही योजनेमधून निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांना आमदार निधीतून निसराळे येथे पाणी टाकीसाठी निधी उपलब्ध केला आहे ही विशेष बाब आहे. यापुढेही आमदार बाळासाहेब पाटील कराड-उत्तरच्या विकास कामांसाठी कटीबध्द राहतील असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, या विभागाचा व माझा सह्याद्रि कारखान्यामुळे संबंध होता, पुढे तो विधानसभेमुळे अधिकचा दृढ झाला आहे. या विभागामध्ये यापूर्वी स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी चांगला विकास साधला आहे. तसेच त्यांचे नंतर आमदार शिवेंद्रसिंह बाबांनीही या विभागावर चांगले लक्ष देवून सर्वांना बरोबर घेवून मोठ्या प्रमाणावर विकास कांमे केली आहेत. निसराळे गावाने विकास कामांत सातत्याने एकी ठेवली आहे. तसेच विकास कामांबाबत चांगला पाठपुरावा केला असून विकास प्रक्रिया राबवणेत ते अग्रेसर राहीले आहेत. त्यामुळेच या गावांमध्ये निसराळे ते मत्यापूर रस्त्यावरील ओढ्यावर दोन साकव पूल तसेच निसराळे बेलदार वसाहतीकडे जाणार्या ओढ्यावर साकवपूल तसेच सभा मंडप, दोन अंगणवाडी इमारती व बेलदार वसाहतीमधील पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच व्यायामशाळा साहित्यासह 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत विस्तारीकरण इत्यादि कामे मार्गी लागली आहेत. सध्याचे भाजपाचे सरकार खोटे बोल पण रेटून बोल याप्रमाणे केवळ घोषणा बाजीवर भर देवून शेतकर्यांच्या सर्व मालांची अनास्था केली आहे.
उरमोडीसाठी भाऊसाहेब महाराजांनी योगदान दिल्यामुळे या विभागाचा अधिकचा विकास झाला आहे. या गावामधील जुना के.टी.वेअर दुरूस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असल्याने निधीची कमतरता राहणार नसल्याने अनेक विकासकामे मार्गी लागतील. विकास प्रक्रियेत ग्रामस्थांनी ऐक्य टिकवावे असे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव (आप्पा) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वश्री धनाजी जाधव व शंकर घोरपडे यांनी केले तसेच प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यंानी केले. तर आभार संभाजी घोरपडे यांनी मानले.
दरम्यान गावातील दहावी इयत्तेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पोलिस दलामध्ये उत्कृष्ठ कामगिरी पार पाडणारे गावचे सुपूत्र तानाजी शांताराम घोरपडे यांचा सत्कार आणि गावची माहेरवासिन व आंदळी गणातून निवडून आलेल्या माण पंचायत समिती सदस्या सौ. कविता जगदाळे सत्कार आमदार बाळासाहेब पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ.वनिता गोरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, विश्वासराव शेडगे-पाटील, धनंजय शेडगे, पंचायत समिती सदस्या सौ. बेबीताई जाधव, सौ.कांचनताई काळंगे, सौ.कविता जगदाळे, नागठाणे येथील सचिन पाटील, संजय साळुंखे, भूषणगड येथील विलास शिंदे, जयवंत सरनोबत, निसराळेच्या सरपंच सौ. रूपाली कांबळे, उपसरपंच अंकुश घोरपडे, शंकरराव घोरपडे, रामचंद्र घोरपडे, धनाजी जाधव, राहूल गायकवाड,शंकरराव देशमुख, विजय घोरपडे, बबनराव घोरपडे, विजय गायकवाड, संभाजी घोरपडे, निजाम मुलाणी, सह्याद्रि कारखान्याचे संचालक पै.संजय थोरात, पै.संजय कुंभार, नितीन कणसे पाटील, राजेंद्र जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.के.जाधव आणि पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.