एक जण फरार, 64 हजाराचा मुद्देमाल जप्त
सातारा : बैल बाजार कराड येथून गायी विकत घेऊन जाणार्या पिकअप चालकाला पाचवड फाटा येथे दोन गाड्यांनी अडवून लुटणार्या पाच जणांच्या टोळीपैकी चौघांना चोवीस तासाच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. कोल्हापूर येथील व्यापारी बाबासाहेब लोंढे यांच्या पिकअप व्हॅन चालक बंडू भिमराव झाकले (वय 35, रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली) याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही फिर्याद शून्य नंबरने कराड शहर पोलिस ठाण्याला वर्ग करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने चपळाईने तपास करुन सागर चंद्रकांत बर्गे (वय 32, रा. अजिंक्यनगर कोरेगाव), किरण संजय निकाळजे (वय 26, अंबवडे, ता. खटाव), मनोज उर्फ सोन्या प्रकाश वाघमारे (वय 22, रा. रंगनाथस्वामी निगडी, ता. कोरेगाव), सूरज उर्फ दत्ता संभाजी बर्गे (वय 27, रा. अजिंक्यनगर कोरेगाव) या चौघांना कोरेगाव व त्रिपुटी परिसरातून अटक करण्यात आली आहे. ज्या इस्टिम वाहनातून जावून आरोपींनी गुन्हा केला त्या वाहनाचा मालक गणेश विश्वनाथ काटकर (वय 32, रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव) हा अद्याप फरार आहे. दि. 4 रोजी सकाळी 11.30 वाजता काटकर व टोळक्याने इस्टिम व मारुती या दोन गाड्यांमधून पिकअप चालक लोंढे याला पाचवड फाटा येथे अडवले. व पोलिस असल्याचे बतावणी करुन त्याला भिवडी, ता. कोरेगाव येथे आणले. त्याच्या खिशातील अडीच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व गाडीतील 4 गाया तेथेच चारायला सोडून देण्यात आल्या. जर्सी गाईचे मालक शैलेंद्र भिंगारदेवे व अशोक खाडे यांना शेंद्रे येथे बोलावून त्यांनाही मारहाण करण्यात आली व त्यांच्याकडून जबरदस्तीने 20 हजार रुपये काढून घेण्यात आले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार कराड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त तपास मोहिम हाती घेतली. रेकॉर्डवरील काही गुन्हेगारांच्या छायाचित्रावरुन फिर्यादीने काही जणांना ओळखले. तसेच जी. के. सरकार असा उल्लेख असणारी काळ्या रंगाची इस्टिम ही कोरेगाव येथील गणेश काटकर याची असल्याचे माहिती समोर आली. पोलिसांनी सूतावरुन स्वर्ग गाठत काटकरच्या टोळक्यातील अन्य चौघांना संशयावरुन ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. या आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
महामार्गावर लुटमार करणार्या टोळीला अटक
RELATED ARTICLES