(दै. ग्रामोद्धार ) कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कोरेगावात लक्ष केंद्रीत केले असून, दाखल झालेल्या 102 अर्जांपैकी 17 उमेदवारांचे 31 अर्ज छाननीमध्ये अपात्र ठरविण्यात आले. एकाच उमेदवाराने एका पेक्षा जास्त अर्ज दाखल केले असल्याने त्यांचे प्रत्येकी एक अर्ज अपात्र ठरले असले तरी ते निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. भाजपने एकाचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 व काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेतली, मात्र सुनावणीनंतर हरकती फेटाळण्यात आल्या असून, सर्व अर्ज पात्र ठरविण्यात आले. अन्य दोन अर्ज देखील सुनावणीत पात्र ठरविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत निवडणूक रिंगणात 71 जण आहेत.
नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी 102 अर्ज दाखल झाले होते. सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्चितीवरुन गोंधळ असल्याने जवळपास सर्वच उमेदवारांनी पक्षाच्या उमेदवारीसह अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या अधिकृत उमेदवारांचे ए. बी. फॉर्म सादर केले होते. त्यामुळे पक्षांनी जास्त भरलेले अर्ज अपात्र ठरणार हे स्पष्ट झाले होते. बुधवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी 11 वाजता छाननी प्रक्रियेस सुरुवात केली. प्रभाग निहाय छाननी प्रक्रिया राबविण्यात आली.
भाजपचे प्रभाग क्र. 13 मधील उमेदवार विठ्ठल बर्गे यांनी तत्कालीन कोरेगाव ग्रामपंचायतीत झालेल्या अपहार प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी सुरु असून, सरपंच व अन्य सदस्यांचा त्या चौकशीत समावेश आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले मंदा किशोर बर्गे (प्रभाग क्र. 3), महेश साहेबराव बर्गे (प्रभाग क्र. 4), युवराज विश्वासराव बर्गे (प्रभाग क्र. 8), प्रतिभा शिवाजीराव बर्गे (प्रभाग क्र. 7), संजय लक्ष्मण पिसाळ (प्रभाग क्र. 11), संतोष विलास चिनके (प्रभाग क्र. 15) व डॉ. मनिषा गणेश होळ (प्रभाग क्र. 16) हे त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य होते, ते शासकीय थकबाकीदार असून, त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. या हरकतींवर भाजपच्यावतीने अॅड. पुरुषोत्तम बारसावडे व अॅड. अमोल भुतकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्यावतीने अॅड. निलेश झांजुर्णे व बाचल यांच्यावतीने अॅड. धैर्यशील घारगे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी हरकती फेटाळून लावत सर्व अर्ज पात्र ठरविले.
प्रभाग क्र. 15 मध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रदीप बाचल यांनी अर्जामध्ये उल्लेख केलेल्या शिंपी व नामदेव शिंपी जातीबद्दल त्याच प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष चिनके यांनी हरकत घेतली होती, त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रांत खराडे यांनी बाचल यांचा अर्ज पात्र ठरविला. प्रभाग क्र. 10 मध्ये रत्ना बाळू बोतालजी यांच्या अर्जावर निलेश बोतालजी यांनी हरकत घेतली होती. त्यांची नगरपंचायतीच्या मिळकत कराची थकबाकी असल्याचा व त्यांना तीन अपत्ये असल्याचा आक्षेप घेतला होता, मात्र थकबाकी नसल्याचा दाखला मुख्याधिकारी पूनम कदम-शिंदे यांनी सादर केला. तसेच तीन अपत्ये असल्याबाबतचा पुरावा हरकत घेणार्या व्यक्तीने सादर न केल्याने हरकत फेटाळण्यात आली व बोतालजी यांचा अर्ज पात्र ठरविण्यात आला.
अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. 1 रशीद अजिज शेख (काँग्रेस), शंकर गुलाब पवार (काँग्रेस), जयसिंग मारुती लोखंडे (भाजप). प्रभाग क्र. 2 वसुंधरा बाळासाहेब बर्गे (काँग्रेस). प्रभाग क्र. 3 विद्या दत्तात्रय झांजुर्णे (भाजप), श्रुतिका सागर बर्गे (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग क्र. 4 किरण तानाजी बर्गे (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग क्र. 5 शोभा सुधाकर गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग क्र. 8 अॅड. अभिजित जयवंतराव केंजळे (काँग्रेस) प्रभाग क्र. 9 अजित सदाशिव बर्गे (काँग्रेस). प्रभाग क्र. 10 रत्नमाला संजय बोतालजी (काँग्रेस). प्रभाग क्र. 11 अमोल भिकू शिंदे (काँग्रेस). प्रभाग क्र. 12 वर्षा जयसिंग लोखंडे (भाजप). प्रभाग क्र. 13 दिनेश बबन सणस (भाजप). प्रभाग क्र. 14 चैताली बाळकृष्ण सुतार (भाजप). प्रभाग क्र. 16 आशा दिलीप धोंगडे (काँग्रेस). प्रभाग क्र. 17 सत्वशिला अशोक विधाते (अपक्ष).
दरम्यान, भाजपने अत्यंत मुद्देसुदपणे हरकती दाखल केल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकार्यांना हरकतीतील प्रत्येक मुद्दा पटवून देण्यात आला होता, मात्र त्यांनी तांत्रिक बाबी दाखवत हरकती फेटाळल्या आहेत. यावर भाजप नाराज झाले असून, आता जिल्हा व सत्र न्यायालयात तातडीने अपिल दाखल केले जाणार आहे. भाजपचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून, आमची अपिले कायम होतील, असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे व हरकतदार विठ्ठल बर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
(दै. ग्रामोद्धार )