फलटण : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी फलटण तालुक्यातील मराठा समाज बांधवांचा सर्वपक्षीय मोर्चा दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता लाखाच्या संख्येत काढला जाणार असल्याची घोषणा फलटण येथील मराठा समाज बांधवांच्या प्रातिनिधीक बैठकीत करण्यात आली.
राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाद्वारे विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातही तालुका स्तरीय मोर्चा काढण्यासाठी येथील महाराजा मंगल कार्यालयात फलटण तालुक्यातील मराठा समाज बांधवांची मोर्चा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, युवा नेते रणजितसिंह ना. निंबाळकर, नीमंत शिवरुपराजे खर्डेकर, धनंजय साळुंखे-पाटील, दत्तात्रय गुंजवटे, मराठा महासंघाचे नानासाहेब पवार, स. रा. मोहिते, संभाजी ब्रिगेडचे विशाल शिंदे नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, भाजपाचे सुशांत निंबाळकर, मितेश उर्फ काकासाहेब खराडे, उत्तमराव भोसले, बबनराव निकम, महेंद्र बेडके, जयकुमार शिंदे, अॅड. विरसेन कदम, डॉ. जे. टी. पोळ, समशेरसिंह ना. निंबाळकर, अमित रणवरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, गट, तट, पक्ष विसरुन मराठा समाजाने मोर्चात सहभागी व्हावे. पक्षीय जोडे बाहेर सोडून मोर्चात सक्रीय होण्याची आवश्यकता आहे. जिल्हा स्तरावरील मोर्चात आपण सहभागी होऊ मात्र ज्या ठिकाणी अॅट्रासिटीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या त्याठिकाणी मोर्चा निघालाच पाहिजे.
यावेळी स. रा. मोहिते, नानासाहेब पवार, शिवरुपराजे खर्डेकर आदींनी मार्गदर्शन केले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रमोद रणवरे यांनी तर प्रास्ताविक विशाल शिंदे यांनी केले.
मोर्चा नियोजन बैठकीत बोलताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर व मान्यवर.