सातारा: गेली 40 वर्षे सातारा शहराची सत्ता राजघराण्याच्याच हातात आहे. कधी आलटून पालटून तर कधी मनोमीलनातून सत्ता राबविली गेली आहे. लोकशाही मार्गाने राजेशाही सातारकरांच्या बोकांडी बसली आहे. या सत्तेने शहरात अनेक अपप्रवृत्ती जन्माला घातल्या असून शहराचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. त्यामुळे दोन्ही राजांना सातारा शहराच्या राजकारणातून हद्दपार करा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील आणि प्रभाग 15 मधील उमेदवार सागर पावशे व सौ. आशा पंडित यांच्या प्रचारार्थ झालेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पदयात्रेत भाजपाचे पॅनेलप्रमुख दीपक पवार, शहराध्यक्ष सुनील काळेकर, सरचिटणीस विकास गोसावी, जयदीप ठुसे, विठ्ठल बलशेटवार, किशोर गोडबोले, उमेदवार व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.दत्ताजी थोरात म्हणाले, सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीचा अग्रणी असलेला आहे. हुतात्म्यांची एक पिढी या जिल्ह्याने दिली. स्वातंत्र्योत्तर काळात कृषी औद्योगिक क्रांती आणि सहकाराचा पाया या जिल्ह्याने घातला. सामुदायिक नेतृत्व ही या जिल्ह्याची खासियत होती. या जिल्ह्यानेच देशाला व राज्याला अनेक उत्तुंग नेते दिले. बराच काळ राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्यातील होते. मात्र, 40 वर्षांपूर्वी या परंपरेला ग्रहण लागले. लोकशाही मार्गाने राजेशाही सातारा शहराच्या सत्तेवर आली. सुरुवातीच्या काळात आब व आदर राखूनअसलेले उत्तरार्धात मात्र बोकाळले आहेत. कार्यकर्त्यांची जागा झुंडशाहीच्या टोळक्याने घेतली. टगेगिरी, हप्ता वसुली, खंडणी यांना ऊत आला. ते करणार्यांना प्रतिष्ठा मिळू लागली. याची परिणती एमआयडीसी ओस पडण्यात आणि शहरातील व्यापारउदीमाची प्रगती खुंटण्यात झाली. या अपप्रवृत्तींना पाठीशी घालाणारे आणि ओठांवर मात्र जनहिताचा उच्चार करणारे दोन्ही राजेच जबाबदार आहेत. या प्रवृत्ती राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय शहराच्या समाजकारणाला व अर्थकारणाला गती मिळणार नाही. सध्या मनोमीलनातून सत्तेत असलेल्या दोन्ही आघाड्यांच्या फक्त नावातच विकास आहे. मात्र, त्यांचा दृष्टीकोन फक्त स्वत:चा आणि आपल्या मोजक्या चमच्यांचाच विकास करण्याचा असल्याने सातारा शहर भकास झाले आहे. सातार्यात अनेक मूलभूत सुविधांचे प्रश्न इतक्या वर्षांनंतरही कायम आहेत. शहराच्या स्वच्छतेची ऐशीतैशी आहे. अनधिकृत बांधकामे, ठिकठिकाणी असलेली अतिक्रमणे यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. सत्ताधार्यांनी कचरा व्यवस्थापन प्रकल्प आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी पालिकेतील ठेके त्यांना दिले जातात. सत्ताधारी नगरसेवक आणि अपात्र ठेकेदार अशी अभद्र युती दिसते. महत्त्वाचे ठेके कोणाला द्यायचे याचे आदेश या किंवा त्या वाड्यावरुन निघतात. त्यामुळे पालिकेच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. पालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे लोक आपल्याला नाकारतील या भीतीने दोन्ही राजांनी मनोमीलनाला तिलांजली देत संघर्षाचे नाटक सुरू केले आहे. मात्र, या नाटकाचे तमाशात रूपांतर झाल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट झाले आहे