भुईजः सातारा ही स्वातंत्र्यसैनिकांची आणि शुरवीरांची भूमी आहे. इथल्या मातीने स्वातंत्र्य सैनिकांबरोबरच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला जीवंत पकडणारा तुकाराम ओंबळे हा शुरवीरही दिला. आधुनिक शस्त्रांसह मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला परतवून लावताना दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याबरोबरच अजमल कसाबला जीवंत पकडून या हल्ल्यातील तुकाराम ओंबळेसारख्या शहीद वीरांनी राज्यातील जनतेचा पोलीस दलाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला. या हल्ल्यातील शहीदांचे उचित स्मारक उभारून किसन वीर कारखान्याच्या नेतृत्वाने देशभक्तीतून खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे, असे प्रतिपादन वाईच्या प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे यांनी केले.
किसन वीर कारखाना कार्यस्थळावर 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावताना आपल्या प्राणाची बाजी लावणार्या शहिदांना अभिवादन, मानवंदना आणि संविधान दिन अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापरावभाऊ भोसले, कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब भरणे म्हणाले, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा अत्यंत महत्वाची असून सैनिक सीमेचे रक्षण करतात. देशांतर्गत दहशतवादी हल्ले परतावून लावताना पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांना बलीदान द्यावे लागते. मात्र, अलिकडे पोलीसांवरही होत असलेले हल्ले चिंताजनक असून पोलीसांचा तिटकारा केला जातो. देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी राज्यातील प्रत्येक पोलीस अहोरात्र झटत असतो याची जाणीव ठेऊन जनतेने पोलीसांबद्दल आदर व्यक्त केला पाहिजे, त्यांच्या चांगल्या कामाला शाबासकीची थाप दिली पाहिजे. 26/11 च्या हल्ल्यात अजमल कसाबसारख्या अतिरेक्याला जीवंत पकडल्याचे जगातील एकमेव उदाहरण असून तो पकडला गेल्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी मनसुबे कळले. अशा घटना टाळण्यासाठी जनतेनेही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असून पोलीस दलही त्यासाठी सहकार्य करेल, असे सांगून श्री. भरणे यांनी कारखान्याने उभारलेले शहीद स्मारक निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
प्रा. काशिनाथ चव्हाण-पाटील यांनी शहीदांना काव्यातून अभिवादन केले. प्रारंभी प्रतापरावभाऊ भोसले, नंदा पाराजे, बाळासाहेब भरणे, मदनदादा भोसले, गजानन बाबर यांनी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे व कारखान्याचे सुरक्षा अधिकारी एस. एम. बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दल आणि कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी शहिदांना मानवंदना दिली. इनचार्ज सेक्रेटरी नारायण काळोखे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन केले. कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्रताप देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन दत्तात्रय शेवते यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, आशा फाळके, डॉ. दत्तात्रय फाळके, जयवंत साबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडीक, माजी संचालक नंदाभाऊ जाधव, केशवराव पाडळे, माधवराव निगडे, शंकरराव पवार, अॅड. धनंजय चव्हाण, अॅड. मेघराज भोईटे, वाईचे नगरसेवक सतिश वैराट, अमजद इनामदार, माजी नगरसेवक शेखर शिंदे,अर्जुन भोसले,अनिल वाघमळे, किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर येवले, प्रा. रमेश डुबल, अनिल जोशी, सुरेश पवार, शेखर भोसले-पाटील, सुनिल शिवथरे, हणमंतराव गायकवाड, किशोर बाबर, रमेश पाटील, मनोज भोसले, संभाजी शिंगटे, प्रा. सुनिल सावंत, प्रा. चव्हाण, प्रा. वैद्य, दत्तात्रय शिंदे, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
26/11 शहीद स्मारक उभारून कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपली : नंदा पाराजे ; किसनवीरवर शहीद अभिवादन व संविधान दिन संपन्न
RELATED ARTICLES