झाकिरची सखोल चौकशी करणार
नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्यावर सरकार कदापि तडजोड करणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले असून, प्रक्षोभक भाषणे दिल्याचा आरोप असलेला कथित मुस्लिम धर्मोपदेशक झाकिर नाईकच्या भाषणांच्या सीडीजची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
झाकिर नाईकच्या भाषणांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशीसाठी आवश्यक ते निर्देश दिले आहेत. झाकिरच्या भाषणांच्या सीडींची सखोल चौकशी करून, आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे राजनाथसिंह यांनी येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकारबाबत विचाराल तर, काहीही झाले तरी आम्ही दहशतवादाच्या मुद्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशची राजधानी ढाका येथील सुरक्षित समजल्या जाणार्या भागातील कॅफेवर दहशतवादी हल्ला करणार्या अतिरेक्यांनी झाकिर नाईकच्या भाषणांपासून प्रेरणा घेतल्याचे समोर आल्यानंतर झाकिर वादाच्या भोवर्यात अडकला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील झाकिरच्या भाषणांची चौकशी करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांना गुरुवारी दिले. नाईकची भाषणे, सोशल मीडियावरील त्याची खाती आणि मुंबईत त्याच्याकडून चालविल्या जाणार्या फाऊंडेशनला मिळणार्या निधीची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशने झाकिरची माहिती मागितल्यानंतर तो राष्ट्रीय तपास संस्था (एनआय) व इतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला असून, ढाक्यातील हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या हत्येसाठी अतिरेक्यांना प्रेरित केल्याच्या आरोपाचे त्याने खंडन केले आहे. एकाने दुसर्याला मारावे यासाठी प्रेरित करणारे एकही भाषण मी केले नाही व कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे सध्या परदेशात असलेल्या झाकिरने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.