केंद्रात व राज्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील 195 स्थानिक स्वराज्य संस्था व चार नगर पंचायतीच्या निवडणूकांचा अजेंडा समोर ठेवला असून त्या दृष्टीने पक्षाध्यक्ष अमित शहा व कंपूची पावले पडायला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या जोरावर राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी राज्यात व केंद्रात पाच दशके राजकारण केले. त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पश्चिम महाराष्ट्रातील पाळेमुळे कमजोर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कोल्हापूर येथे काही महिन्यापूर्वी पक्षाच्या झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना तयारी करुन पक्ष चिन्हावरच लढण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यश मिळवण्यासाठी 137 सदस्यांची जंबो कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली. पुणे विद्येचे माहेरघर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांना राजघराण्यांचा वारसा, सोलापूर सुतगिरण्यांचे मोठे केंद्र तर सांगली भविष्यात होवू घातलेले मोठे वाईनरी हब यामुळे भाजपचे मनसुबे मंबई महानगरपालिकेनंतर पश्चिम महाराष्ट्र काबीज करण्याचे आहे. शरद पवारांचे वास्तव्य बारामती तालुक्यातील काटेवाडी असले तरी त्यांचे मुळ कोरेगाव तालुक्यातील नांदवळ आहे आणि हा भाग साहेबांच्या माढा मतदार संघात मोडतो. त्यामुळे राष्ट्रवादीची सातारा जिल्ह्यावर विशेषत: थोरल्या साहेबांची बारकाईने नजर असते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातच भाजपचा एकखांबी तंबू रोवण्याची कसरत सुरु झाली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या 15 जुलैपासून पाटण तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे मोठे शिबिर घेण्याचा घाट घातला जात आहे. या शिबिरात 200 पदाधिकारी सहभागी होणार असून या शिबिराला कार्यकर्ता निवासी शिबिर असे नाव देण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रवादीच्या रणनितीला तोडीसतोड अजेंडा काय राबवायचा याची खलबते होणार आहेत. या शिबिरासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घालण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील भाजपाचे सर्व खासदार व आमदार सातार्यात मार्गदर्शनासाठी येणार असल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची एक प्रकारे अग्निपरिक्षाच आहे. प्रदेश कार्यकारणी समितीच्या सदस्या श्वेता शालीनी यांनी पावसकर यांच्या निवडीनंतर भाजपची जिल्हा कार्यकारणी मिडीया फ्रेंडली राहील व आगामी निवडणूकांसाठी ठरवल्या जाणार्या रणनितीवर मासिक बैठका होतील, असे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र, त्या पुण्यात गेल्या आणि हारतुर्याच्या स्वागतानंतर भाजपची जिल्हा कार्यकारणी त्यांनी सांगितलेला अजेंडाही विसरुन गेली. मात्र, पाटण तालुक्यात होणारे हे निवासी शिबिरासाठी मंत्रीमंडळातील अर्धा डझन नामदार मंडळी उपस्थित राहणार असल्याने भाजपा कार्यकर्ता खर्या अर्थाने चार्ज झाला आहे. गेल्या दशक भरात एकट्या जावली, महाबळेश्वर, सातारा व कराड या चार तालुक्यांच्या जोरावर शिवसेनेने जिल्ह्यात भगव्या वादळाची ताकद दाखवून दिली.त्यामध्ये तत्कालीन जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांचा मोठा वाटा होता. त्या तुलनेने भाजपचा प्रवास हा फारसा समाधानकारक राहिलेला नाही. जिल्हा पातळीवर ठसा उमटवतील अशी स्टार प्रचारक मंडळी तसेच कार्यकर्त्यांची मोट बांधणारे एकहाती नेतृत्व नसल्याने भाजपचा जिल्ह्यातील प्रवास टायटॅनिकच्या बोटीसारखा राहिला आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या पाच वर्षात सक्रिय झाले असले तरी समन्वयाच्या अभावामुळे भाजप जिल्हा कार्यकारणीचा एकमुखी चेहरा अद्यापही समोर आला नाही. सातारा कराडचा आजपर्यंतचा असलेला राजकीय सवतासुभा नेहमीच अडचणीचा ठरला आहे. याचा फटका दस्तुरखुद आघाडी शासनाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बसला होता. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र ही टॅगलाईन घेवून भाजप कार्यकर्ता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरा जाणार आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांना स्वबळाचाच नारा दिला जाणार असल्याने जिल्ह्याचे राजकारण वेगळे वळण घेताना दिसेल.