सातारा ः सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून कोयना धरणात आज एका दिवसातच विक्रमी 135 मिमी तर नवजा येथे 146 मिमी व महाबळेश्वरमध्ये 67 मिमी एवढा पाऊस झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. कोयना धरणात आज 30.28 टीएमसी एवढा पाणी साठा झाला आहे. दरम्यान, रविवारी पहाटे पावसाच्या संततधारेमुळे संभाजीनगर मेघदूत कॉलनी येथील हनुमान मंदिराजवळ एका घराची वॉल भिंत पडून नुकसान झाले आहे.
धोम धरणात 22 मिमी पाऊस झाला असून 3.87 टीएमसी पाणी साठा झाला आहे. कण्हेर धरणात 22 मिमी. पाऊस झाला असून 2.75 टीएमसी पाणी साठा झाला आहे. उरमोडी धरणात 46 मिमी पाऊस झाला असून 4.57 टीएमसी पाणी साठा झाला आहे. धोम-बलकवडी धरणात 45 मिमी पाऊस झाला असून 1.68 टीएमसी पाणी साठा झाला आहे. महू-धरणात 9 मिमी पाऊस झाला असून 0.127 टीएमसी पाणी साठा झाला आहे. हातगेघर धरणात 26 मिमी पाऊस झाला असून 0.26 टीएमसी पाणी साठा झाला आहे. नागेवाडी धरणात 21 मिमी पाऊस झाला असून 0.095 टीएमसी पाणी साठा झाला आहे. मोरणा-गुरेघर धरणात 60 मिमी पाऊस झाला असून 0.88 टीएमसी पाणी साठा झाला आहे. उत्तरमांड धरणात 40 मिमी पाऊस झाला असून 0.32 टीएमसी पाणी साठा झाला आहे. तारळी धरणात 75 मिमी पाऊस झाला असून 1.523 टीएमसी पाणी साठा झाला आहे. निरा-देवधर धरणात 76 मिमी पाऊस झाला तर 3.20 टीएमसी पाणी साठा झाला आहे. वांग धरणात 10 मिमी पाऊस तर 0.031 टीएमसी पाणी साठा झाला आहे. कोयना धरणात पाण्याची आवक 2 हजार 886 क्युसेसने होत आहे.
तालुका निहाय आज झालेला पाऊस सातारा 34.58 मिमी; जावली 68.91 मिमी; कोरेगाव 10.02 मिमी; वार्स 18.71 मिमी; खंडाळा 17.00 मिमी; महाबळेश्वर 173.9 मिमी; कराड 17.15 मिमी; पाटण 50.74 मिमी; फलटण 1.88 मिमी; खटाव 6.67 मिमी; माण 3.14 मिमी; असा एकूण 403.20 मिमी; पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

महाबळेश्वर : गेली काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आज वाढल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेण्णालेकच्या सांडव्यावरील पाणी महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर आल्याने वाहतुक वरचेवर विस्कळीत होत आहे. वाहनांचा वेग मंदावल्यामुळे वाहनांच्या रांगा लांबपर्यत लागत आहे. पार, प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळुन काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.
सायंकाळी या मार्गावर एकेरी वाहतुक सुरू करण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याला यश आले दिना हॉटेलजवळ मोठा वृक्ष कोसळल्यामुळे महाबळेश्वर, पांचगणी रस्त्यावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती वेण्णानदी दुथडी भरून वाहु लागले असून गहु गेरवा संशोधन केंद्रासमोरील वसाहतीमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच या भागातील सर्व शेती जलमय झाली असून या भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आज सकाळी साडे आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात येथे 170 मी मी तर सकाळी साडे आठ पासून सायंकाळी साडेपाच पर्यंत येथे 96 मि मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर येथे एकूण 1790 मि मी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या पावसाची सरासरी यंदाच्या पावसाने ओलांडली आहे. लिंगमळा धबधब्यावरून मोठया प्रमाणावर पाणी कोसळत आहे त्याच प्रमाणे सर्व घाटातील छोट्या छोट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. यापावसात ओले चिंब भिजण्यासाठी तरूणाई पुढाकार घेताना दिसत आहे. विकेंडची सुट्ट्ी संपल्याने वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी परतीचा मार्ग धरला आहे येथील बाजारपेठेत तुरळक पर्यटक दिसत असुन मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरकरांना चांगलेच झोडपून काढल्याने त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेगवान वारे व अतिवृष्टीमुळे वेण्णा तलावावरील नौकाविहार पालिकेने बंद ठेवला आहे. त्यामुळे वेण्णातलावावर शुकशुकाट दिसत आहे.

पाटण : नवजा, कोयना, परिसरासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असून, गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी 150 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसाने 24 तासात विक्रमी 4.61 टी.एम.सी.ने धरणातील पाण्यात वाढ झाली आहे. धरणातील एकुण पाणीसाठा 30.27 टीएमसी झाला आहे. गेल्या आठ दिवसात कोयना धरणात 18 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पाटण शेजारील मुळगाव पुलांना पाणी घासून चालले आहे. तर संगमनगर धक्का जुना पुल पाण्याखाली गेला आहे. मात्र या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून, या पुलावरून लोकांसाठी पायी येण्या-जाण्याचा मार्ग खुला आहे तर, या पुलापासून 1 कि.मी. अंतरावर नवीन बांधण्यात येणार्या मणेरी पुलावरून वाहतुक सुरू झाल्याने जुना संगमनगर धक्का पुलामुळे पावसाळ्यात लोकांची होणारी गैरसोय दूर झाल्याने संगमनगर धक्का पुलाकडील 36 गांवाच्या लोकांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण दिसत आहे. पाटण तालुक्यात पाऊसाची संततधार चालू असून शेतकर्यांच्यात भात लागवणीला व नाचणी आवटणीला वेग आला आहे. या पावसाने शेतकर्यांच्यात समाधान पसरले आहे. कोयना, नवजा, परिसरात कोयना पाणलोट क्षेत्रात संतत धार पाऊसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे